प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद : सुरेश धस यांच्यासोबत वाकयुद्ध चिघळले
भाजप आमदार सुरेश धस आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यात सध्या चांगलाच वाद रंगला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना लक्ष्य करताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीवर उपहासात्मक टीका केली होती. यावर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत आपल्या भूमिका स्पष्ट करत कडक इशारा दिला आहे. प्राजक्ताने सुरेश धस यांना माफी मागण्याची मागणी केली असली, तरी धस यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे, ज्यामुळे हा वाद अधिकच चिघळला आहे.
सुरेश धस यांनी नेमकं काय म्हटलं?
सुरेश धस म्हणाले, “मी काल एसपीसमोर जे काही विधान केलं, त्यात आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं. हे सगळं संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी आहे. माझ्यासाठी प्राजक्ता माळीचा विषय इथेच संपलाय. त्यांचा गैरसमज आहे, तो त्यांनी दूर करावा.” यासोबतच त्यांनी मार्मिक टोला लगावत म्हटलं, “मी महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम पाहायचो. जर त्यांना माझं विधान आवडलेलं नसेल, तर मी निषेध म्हणून तो कार्यक्रम पाहायचा बंद करतो.”
प्राजक्ता माळीची कठोर भूमिका
पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीने स्पष्ट शब्दांत सांगितलं, “माझं मौन म्हणजे मी मान्यता दिली असं समजू नये. हे संपूर्ण प्रकरण खोटं आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी सत्कार घेतानाचा फोटो हा आमचा एकमेव संवाद होता. तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत, मग कलाकारांना यात का ओढताय?”
प्राजक्ताने पुढे महिला कलाकारांविषयी बोलताना म्हटलं, “ज्या महिला साध्या कुटुंबातून येऊन संघर्ष करत आपल्या नावाचा ठसा उमटवतात, त्यांच्या प्रतिमेला अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे डाग का लावायचे? हे कितपत योग्य आहे?” यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडणार असल्याचंही प्राजक्ताने सांगितलं.
वाद कशामुळे सुरू झाला?
धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस म्हणाले होते, “गेल्या पाच वर्षांत धनुभाऊंकडे एवढे पैसे आले कुठून? कोणते सांस्कृतिक कार्यक्रम? आधी रश्मिका मंदाना, मग सपना चौधरी, आणि आता प्राजक्ता माळीसुद्धा परळीला येतेय. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंटचं राजकारण करायचं असेल, त्यांनी परळीत यावं, इथं शिकावं आणि देशभरात प्रचार करावा.”
वादाची सध्याची स्थिती
प्राजक्ता माळीच्या माफीच्या मागणीला सुरेश धस यांनी स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे वाद आणखी चिघळला असून प्राजक्ता यावर ठाम भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर प्रकरणात काय वळण येईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाने राजकारण आणि मनोरंजन क्षेत्र यांच्यातील तणाव वाढला आहे. प्राजक्ता माळीने ठामपणे आपली बाजू मांडली असली, तरी सुरेश धस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.